Thursday 7 December 2017

दोन वृक्ष







दोन वृक्ष (रूपक-कथा)

खुपंच विहंगम दृश्य होते ते. प्रत्येक वृक्ष आपल्या हिरव्या सौंदर्याचा अभिमान करत मस्त मदालसे प्रमाणे हसत उभा होता. पण ते दोन पिंपळ मात्र एकमेकांकडे विलक्षण कारुण्याने पाहत उभे होते. युगानुयुगे ..... असेच .... अन् त्यांच्या मधून वाहणारा झराही तसाच ... युगानुयुगे!

एका लोककथेप्रमाणे दोघांचे मुळ पृथ्वीच्या गर्भात एकच होते. त्यांची करूण नजर हे अधिकच स्पष्ट करत होती. कुठल्याश्या शापाने पृथ्वीवरती ते वेगवेगळे रहात होते. तो झरा मात्र तीलोत्तमेप्रमाणे सुंद-उपसुंदाचा पराभव केल्यानंतरच्या अविर्भावात त्यांच्या मधून वाहत त्यांच्या वेगळेपणाची साक्ष देत होता. सुंद-उपसुंद तरी तीलोत्तमेमुळे मृत्युस प्राप्त झाले, इथे मात्र आपल्या प्रियजनांपासून दुरावलेल्या वृक्षशाखा मृत्युच्या प्रतिक्षेत होत्या. परंतु प्रत्यक्ष मृत्युपेक्षा मृत्युची प्रतीक्षा ही अधिक भयावह असते याचा त्यांना प्रत्यय येत होता.

"आपल्या दोघांमध्ये फरक करणारा, दुरावा आणणारा, आयुष्यभरासाठि वेगळं करणारा हाच तो दुष्ट झरा!" असं म्हणुन पहिला वृक्ष त्या झऱ्याला शिव्यांची लाखोली वाहु लागला, तसा दुसरा वृक्ष त्याला समंजसपणे म्हणाला "नाही रे वेड्या! हा झरा आपल्यातील तफावत नाही तर दुवा आहे. याने आपल्याला वेगळं केलं नसुन आयुष्यभरासाठी जोडलय.... अगदी कल्पांतापर्यंत...!”

हे ऐकताच पहिल्या वृक्षाच्या चेहऱ्यावर समाधानाच हसु पसरल आणि ते दृष्य पाहुन मदालसेप्रमाणे हसणाऱ्या वृक्षाच हसु सात्विक हास्यात बदलुन निसर्ग अधिकच सुंदर दिसू लागला.


लेखक- प्रज्वल सुंदरराव पारडे.
दिनांक- ०२ डिसेंबर २०१४.