Wednesday, 15 November 2017

भयभय


रात्रीचा सुमार... बोचरी थंडी... रस्त्यावरचा अंधुक प्रकाश... सभोवताली गर्द झाडी... वाऱ्याने हलकेच होणारी पानांची सळसळ... आणि रक्ताळलेला अर्धचंद्र.... भयनिर्मितीसाठी चपखल वातावरण आणि कॉलेज अजूनही दोन किलोमीटर दूर.
या रस्त्यावरून जायची दिपकची हि काही पहिलीच वेळ नव्हती, फरक एवढाच कि हि वेळ पहिली होती. इतक्या रात्री तो कधीच या परिसरात आलेला नव्हता, कारण तशी कधी गरजच पडली नव्हती; पण आता इंजिनीयरिंगची एक्झाम तोंडावर येऊन ठेपलेली. त्यात नवीन अडमिशन आणि हि पहिली एक्झाम. रूमवर रूममेट्सच्या धिंगाण्यामुळे अभ्यास होत नसे म्हणून उदास बसलेला असताना त्याला एका मित्राने सांगितले कि कॉलेजची लायब्ररी म्हणे रात्रभर सुरु असते आणि अभ्यासदेखील खूप मस्त होतो. ते ऐकताच दिपकने निश्चय केलेला कि आज रात्री अभ्यासासाठी कॉलेजवरच जायचं.
निश्चय तर केला पण ते तितकं सोप्पं नव्हतं कारण एक तर त्याचं कॉलेज आडवळणी आणि त्याच्याकडे वाहन नाही. निदान मुख्य रस्त्यापर्यंत तरी कोणीतरी लिफ्ट देईल हे त्याला माहित होत म्हणून त्याने त्यानंतर कॉलेज फाट्यापासून कॉलेजपर्यंत तीन किलोमीटर चालत जायचा निर्णय घेतला. दिपकने जेवणाअगोदरच व्यवस्थितपणे दोन पुस्तके, दोन पेन, एक जाडजूड रफ वही आणि हनुमान चालीसा लिहिलेली एक पत्रिका बाजूला काढून ठेवली. मोबाईल जाणीवपूर्वक अभ्यासात अडथळा म्हणून सोबत घेतला नाही. आहारही झोप येऊ नये या बेतानेच केला आणि मघाशी बाजुला काढलेलं सामान घेऊन तो रुमच्या बाहेर पडला.
अपेक्षेप्रमाणे त्याला मुळशीला जाणाऱ्या एका भल्या गृहस्थाने कॉलेज फाट्यापर्यंत लिफ्ट दिली आणि जाताना “व्यवस्थित जा सांभाळून” एवढ बोलून निघूनही गेला. दिपक क्षणभर स्तिमित होऊन तिथेच तो गृहस्थ असं का बोलला याचा विचार करत थांबला. नाही म्हणायला त्याला त्या गृहस्थाच्या असं म्हणण्याचं कारण कळालही होतं पण तो ते कारण मानायला तयार नव्हता. युनिवरसिटीच्या परीक्षेसमोर त्याला या रात्रीच्या तीन किलोमीटर जंगलावजा प्रवासाची परीक्षा क्षुल्लक वाटली. आता फक्त हनुमान चालीसा म्हणत हे अंतर कापायचं हा निग्रह करून तो चालू लागला.
सुरुवातीचा एक किलोमीटर त्याला फारसं वेगळं असं काही वाटलं नाही परंतु नंतर जसा-जसा परिसराचा मूक संवाद त्याच्या कानी पडू लागला तसा-तसा त्याला त्याच्या हनुमान चालीसाचा असर कमी झाल्याचं जाणवू लागलं.मध्येच झाडावरून उडणारा पक्षी त्याच्या काळजाचा ठाव घेऊ लागला. शांततादेखील किती भयान असू शकते याची त्याला प्रथमच जाणीव झाली अन हनुमान चालीसाची जागा हळू हळू राम रामच्या महामंत्राने घेतली. या सर्व गोंधळात त्याला मोबाईल आणि इयरफोनची उणीव प्रकर्षाने जाणवू लागली होती. निदान एखादी आवडती प्लेलिस्ट लाऊन चाललो असतो तर ही ओंगळवाणी शांतता तरी नजरेसमोर आली नसती असं त्याला प्रत्येक पावलागणिक वाटू लागलं.
गावाकडच्या पिंपळावरील हडळीच्या गोष्टींनी दिपकच्या मनाभोवती फेर धरला होता, स्माशानातली भूतं भस्म लावून त्याच्या मन:पटलावर नाचु लागली होती अन वाळीत टाकलेल्या जखिणी त्याला दात विचकत वेडावून दाखवायला लागल्या तसं त्याने झटदिशी डोकं हलवलं आणि “ही फक्त एक अंधश्रद्धा आहे” असं स्वतःशीच पुटपुटला... अन लागलीच त्याच्या डोक्यात विचार चमकला कि जर ही फक्त एक अंधश्रद्धा आहे तर आपल्याला एवढं घामाने डबडबून जायचं काय काम? असं वेड्यासारखं अभावितपणे पुटपुटण्याच काय कारण? आपण नेमकं कोणाला दिलासा देत आहोत आणि ते ही कोणत्या संकटापासून? आणि ते जे काही संकट असेल ते आपल्या इतक्या पोकळ दिलास्यासमोर नमेल? असे कितीतरी विचार त्याच्या मनात चाललेले असतानाच अचानक...
अचानक दिपकला जाणवलं कि रस्त्याच्या समांतर असलेल्या जाळीच्या पलीकडे असणाऱ्या मकाच्या शेतातून खूप वेळापासून कोणीतरी आपल्यासोबत चालतंय...हळूच कोणीतरी आपल्याला पाहतंय! या जाणीवेने त्याच्या सर्वांगावर शहारा आला अन तो थांबला. दिपक थांबताच त्याला जाणवणारा आवाजही यायचा थांबला. परत तो स्वगतच म्हणाला “निव्वळ भास... बाकी काही नाही!” आता कॉलेज फक्त एक किलोमीटर उरलेलं असल्याने त्याने परत पावलं टाकायला सुरुवात केली तसा जाळीच्या पलीकडूनदेखील चालायच्या येणाऱ्या आवाजाने त्याच्या भासाच्या कल्पनेला सुरुंग लावला तशी त्याची खात्री पटली कि हा भास नाही आणि त्याचे पाय लटपटायला लागले.
दिपकची भीती आता मात्र क्षणाक्षणाला वाढतच चालली होती कारण त्याला पलीकडील शेतातून येणाऱ्या ‘त्या’ आवाजाचं कारण स्पष्ट होत नव्हतं. कोणी एखादा शेतकरी मकाला पाणी देत असेल म्हणावं तर पिक तयार झालेलं होतं, मग पाणी द्यायची गरजच काय? अशी प्रश्नार्थक शेवट करणारी उत्तरं त्याचं मन त्याला देऊ लागलं. या सर्वांत त्याला एकच दिलासा होता तो म्हणजे गर्भगळीत दिपकच्या आणि ‘त्या’ अनभिज्ञ आवाजाच्या मध्ये असणाऱ्या संरक्षक जाळीच्या कुंपणाचा! हे ही खरं होतं कि हा दिलासा खूपच तोकडा होता कारण पलीकडील गूढ आवाजाच्या अनैसर्गिक शक्तींच्या लहरी त्याला वातावरणात जाणवू लागल्या होत्या, आणि तसंही हा तोकडा दिलासा लवकरच संपणार होता कारण अजून शंभरएक पावलांवर जाळीच कुंपण संपणार होतं. त्यानंतर पलीकडील गूढ गोष्टीपासून त्याला कोण वाचवणार? या प्रश्नाचं त्याला समाधानकारक उत्तरं न मिळाल्याने तो जागीच थांबला. तो थांबताच पलीकडील येणारा आवाजदेखील थांबला.
आता मात्र दिपकच्या श्वासांच्या लयींनी साथ सोडली होती. उर भात्यासारखा खालीवर होत होता. त्याला तेथूनच उलटं पळावंस वाटू लागलं पण अधिक सुरक्षितता ही जवळ असलेल्या कोलेजवर जाण्यातच होती कारण आता कॉलेज दृष्टीपथात आलेलं. उलट जायचं म्हटलं तरी त्याला त्या अनोळख्या भीतीचा अडीच किलोमीटर सामना करावा लागणार होता. त्या तुलनेने कॉलेजचा पर्याय सोप्पा होता. फक्त अर्धा किलोमीटर परंतु यात एकच मोठ्ठी समस्या होती कारण शेजारील जाळीचं कुंपण थोड्याच अंतरात संपणार होतं.
दिपकने परत एकदा देवाचं नाव घेऊन पुढेच जायचा निर्णय घेतला. निर्णय तर घेतला खरा पण पाय मात्र चालीशी बंड करू लागले. या अजब गुरुत्वाकर्षणाच्या विरोधात तो हळू-हळू पुढे जाऊ लागला. जसा-जसा तो पुढे जाऊ लागला तसा-तसा कुंपणाचा शेवट जवळ येऊ लागला पण तो शेवट कुंपणाचा कि स्वतःचा या विचाराने त्याच्या मनाची प्रचंड घालमेल झाली. भीतीने त्याने डोळे गच्च झाकून घेउन पुढे चालू लागला. डोळे मिटले म्हणून समोरचं वास्तव मिटत नाही हे कळण्या इतपत तो प्रौढ निश्चितच नव्हता आणि तसंही डोळे झाकल्यावर तर त्याच्या डोळ्यासमोरचा भयान काळोख अजूनच गडद झाला अन त्याने खाडकन डोळे उघडले.
डोळे उघडता क्षणीच दिपकच्या लक्षात आल कि तो शेजारून येणारा आवाज बंद झाला होता. त्याला थोडंस हायसं वाटलं अन दुसऱ्याच क्षणी तो परत घामाने डबडबून गेला कारण तो आता कुंपणाच्या शेवटी उभा होता. आता त्याच्या आणि शेताच्या मध्ये असणारी जाळी संपली होती. समोर त्याच्या उंचीपुऱ्या देहयष्टीला आव्हान देणारं मकाच पिक दाटीवाटीने डोलत उभं होतं. या दृष्याकडे पाहत असतानाच त्याला पिकातून एक काळाकभिन्न रक्ताळलेला विकृत पाय बाहेर येताना दिसला आणि एक आसमंत भेदावनारी किंकाळी फोडून त्याचं थंडगार शरीर तिथेच कोलमडून पडलं. आता त्याच्या मनात कसलीही भीती उरली नव्हती कारण हृदयाची धडधड थांबली होती.
अर्धाएक तासात दिपकच्या प्रेताभोवती त्याची किंकाळी ऐकून जवळपासच्या वस्तीवरील बघ्यांची गर्दी जमली. रुग्णवाहिकेला संपर्क करून गर्दी त्या अकस्मात मृत्युच्या कारणांचे तर्क करत उभी होती आणि तीस-पस्तीस फुटांवर एक मलूल कुत्रं स्वत:च्या लंगड्या पायाची रक्ताळलेली जखम चाटत विषण्णपणे गर्दीकडे पाहत बसलं होतं.
भय जिंकलं होतं आणि जगणं हरलं होतं!!! लेखक:-प्रज्वल सुंदरराव पारडे.

39 comments:

 1. सुंदर लिहिता... भयकथा हा आणखीन एक पैलूही छान मांडलाय... कीप इट अप!

  ReplyDelete
  Replies
  1. मनःपूर्वक धन्यवाद कौतुक आणि प्रोत्साहनाबद्दल ...

   Delete
 2. खूप सुंदर लिहिली आहे कथा. वाचताना समोर प्रसंगच उभा राहिला..आणखीन आशाच सुंदर कथा वाचायला आवडतील..!!

  ReplyDelete
 3. This comment has been removed by the author.

  ReplyDelete
 4. This comment has been removed by the author.

  ReplyDelete
 5. This comment has been removed by the author.

  ReplyDelete
  Replies
  1. खूप खूप आभार....प्रामाणिक प्रयत्न केला जाईल आपल्या अपेक्षित कथा लिहिण्याचा!

   Delete
 6. Khupach Chan.....

  parjawal...

  ReplyDelete
 7. सस्पेन्स टिकवून ठेवलाय... मस्त

  ReplyDelete
 8. खूप छान आहे मला सुद्धा दीपक सारखी भीती वाटू लागली आहे. पुढील लेखाची आम्ही आतुरतेने वाट पाहू

  ReplyDelete
  Replies
  1. नक्कीच.... धन्यवाद आप्पा!!!

   Delete
 9. This comment has been removed by the author.

  ReplyDelete
 10. हा लेख वाचून खूप आवडला. या लेखात भीतीने घेतलेला बळी हे चित्र रेखटलस, पुढील लेखात भीतीवर विजय मिळवलेला मुलगा ,या पद्धतीच्या रेखाटणाची वाट पहात आहे

  यशोदा अडसूळ, औरंगाबाद

  ReplyDelete
 11. शाई आणि साईच्या कृपेने तुमच्या अपेक्षित अशा धाटणीची कथा लिहिण्याचा नक्की प्रयत्न करीन!!!

  ReplyDelete
 12. Waaaa chhan ....durmil shabd kanavarti padle

  ReplyDelete
  Replies
  1. खूप खूप आभार अनामिक वाचक!!!

   Delete
 13. dipakch maran manala chataka lavun gel... ugach maral dipakala...

  ReplyDelete
 14. दीपक ला aatack आलता का?

  ReplyDelete
 15. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने |
  शब्दांचीच वस्त्रे यत्ने करु ||
  शब्दचि आमुच्या जीवीचे जीवन |
  शब्द वाटे धन जनलोका ||
  तुका म्हणे पहा शब्दचि हा देव |
  शब्देचि गौरव पूजा करु ||

  शब्दरचना ����������Keep it up

  ReplyDelete
  Replies
  1. प्रतिक्रियेबद्दल खुप खुप आभार महेश!

   Delete
 16. friend i wanted to be write a storty book but a cant get idea so please give some ideas

  ReplyDelete
  Replies
  1. yes for sure friend! Contact me on my Whatsapp Number- 8975267647... we will discuss this over there!

   Delete
 17. Aavdla bhau...bichara deepak��

  ReplyDelete