Thursday 7 December 2017

दोन वृक्ष







दोन वृक्ष (रूपक-कथा)

खुपंच विहंगम दृश्य होते ते. प्रत्येक वृक्ष आपल्या हिरव्या सौंदर्याचा अभिमान करत मस्त मदालसे प्रमाणे हसत उभा होता. पण ते दोन पिंपळ मात्र एकमेकांकडे विलक्षण कारुण्याने पाहत उभे होते. युगानुयुगे ..... असेच .... अन् त्यांच्या मधून वाहणारा झराही तसाच ... युगानुयुगे!

एका लोककथेप्रमाणे दोघांचे मुळ पृथ्वीच्या गर्भात एकच होते. त्यांची करूण नजर हे अधिकच स्पष्ट करत होती. कुठल्याश्या शापाने पृथ्वीवरती ते वेगवेगळे रहात होते. तो झरा मात्र तीलोत्तमेप्रमाणे सुंद-उपसुंदाचा पराभव केल्यानंतरच्या अविर्भावात त्यांच्या मधून वाहत त्यांच्या वेगळेपणाची साक्ष देत होता. सुंद-उपसुंद तरी तीलोत्तमेमुळे मृत्युस प्राप्त झाले, इथे मात्र आपल्या प्रियजनांपासून दुरावलेल्या वृक्षशाखा मृत्युच्या प्रतिक्षेत होत्या. परंतु प्रत्यक्ष मृत्युपेक्षा मृत्युची प्रतीक्षा ही अधिक भयावह असते याचा त्यांना प्रत्यय येत होता.

"आपल्या दोघांमध्ये फरक करणारा, दुरावा आणणारा, आयुष्यभरासाठि वेगळं करणारा हाच तो दुष्ट झरा!" असं म्हणुन पहिला वृक्ष त्या झऱ्याला शिव्यांची लाखोली वाहु लागला, तसा दुसरा वृक्ष त्याला समंजसपणे म्हणाला "नाही रे वेड्या! हा झरा आपल्यातील तफावत नाही तर दुवा आहे. याने आपल्याला वेगळं केलं नसुन आयुष्यभरासाठी जोडलय.... अगदी कल्पांतापर्यंत...!”

हे ऐकताच पहिल्या वृक्षाच्या चेहऱ्यावर समाधानाच हसु पसरल आणि ते दृष्य पाहुन मदालसेप्रमाणे हसणाऱ्या वृक्षाच हसु सात्विक हास्यात बदलुन निसर्ग अधिकच सुंदर दिसू लागला.


लेखक- प्रज्वल सुंदरराव पारडे.
दिनांक- ०२ डिसेंबर २०१४.

Tuesday 21 November 2017

एकटा


नेहमीप्रमाणे आज रात्री पण त्याच्यासोबत त्याचा एकटेपणा चालत होतादिवसभर रंग खेळलेल्या रस्त्यांनी रात्री सुटकेचा निःश्वास टाकल्यामुळे रस्त्यावर निरव शांतता पसरली होती. अंदाजे वेळ माहिती नसली तरी मुहूर्त दोन रात्रींच्या भेटीचा होता.
प्रत्येक पावलागणिक त्याच्या डोळ्यांसमोरून एक चेहरा तरळून जायचा अन प्रत्येक चेहऱ्यासोबतच सुख-दुखाचा लाव्हा डोळ्यातून उसळी घ्यायचाआज संपूर्ण शहर कितीतरी रंगामध्ये न्हाहून गेलेले असताना तो स्वतः इतका कोरडा कसामुळात दिवसें-दिवस त्याचा कोरडेपणा इतका प्रभावी होत होता कि त्याच्या कोरडेपणाला चिंब भिजवण्याची शक्ती कोणतीच भावना बाळगू शकत नव्हतीकाही दिवसांपूर्वी त्याला एक आशेची किरण दिसली होती अन एखाद्या कस्तुरीमृगाप्रमाणे तो त्या आशेचा पाठलाग करू लागला आणि तो पाठलाग त्याला 'त्या' खोल गर्तेत घेऊन गेला जेथून तो एकेकाळी महत्प्रयासाने बाहेर पडला होता.

कुइएन्न्न्न्न्नशब्दात लिहिता येणाऱ्या गाडीच्या ब्रेकच्या आवाजाने तो भानावर आलागाडीचा चालक त्याला वाट्टेल ते बोलून क्षणार्धात नाहीसादेखील झालायानंतर त्याला स्वतःच्याच येणाऱ्या रागामध्ये भयंकर भर पडली.
एका "दिवसाला" स्वतःच्या कोलाहलातूनदेखील "रात्री" शांतता भेटते परंतु त्याला मात्र ती स्वतःची शांत रात्र सापडत नव्हती.”

घर अजून दृष्टीपथातदेखील नव्हतंनेहमीप्रमाणे त्याच्या नातेवाईकाकडून रात्री उशिरा तो घराकडे चालला होतारस्ता पायाखालचा असल्यामुळे तो अगदी रस्त्यावर उभा जरी राहिला असता ना तरी रस्त्याने त्याला रूमपर्यंत सोडले असते, इतकी त्याची  रस्त्यासोबत गट्टी जमली होती, फक्त रस्त्याशीच!!!

चौकात आल्यानंतर त्याच लक्ष एका गोंधळाकडे वेधलं गेलंचौकाच्या कोपऱ्यावर पाच-सहा लहान रंग-बेरंगी मुलं धम्माल करत होतीत्यांचे चेहरे रंगामुळे झाकलेले असले तरी ते चेहरे ट्राफिक सिग्नल वर काही पैशांच्या मोबदल्यामध्ये दुवा विकणाऱ्या श्रीमंत भिकाऱ्यांसोबत मिळते-जुळते वाटत होते.

आज रंगपंचमी होती... रंगोत्सव... रंगाचादिवस... रंगासोबत आनंदाची उधळण... रंगपंचमी संपली होती पण त्या लहान मुलांच्या मौजेचं, आनंदाचं कारण मात्र संपलं नव्हतंती लहानशी मुलं आनंदाच्या एका क्षणाला युगामध्ये बदलून जगत होती अन तो स्वतःचं एका क्षणाचं दुःख युगानुयुगे जगत होतात्या कंपूमधिल एका धीट मुलाने त्याच्यावर रंग उधळला अन "बुरा ना मानो होली है" असे काही बाही ओरडत निघून पण गेला.
तोक्षण... तो रंग... तो लहानगा विना चेहऱ्याचा मुलगातो स्तिमितच राहिलात्याला आनंदाची चावी मिळाली होती कि आपणच असतो जे एका क्षणाचा आनंद युग-युग जगतो किंवा एका क्षणाच्या दुःखाला आयुष्यभर उराशी कवटाळून रडत बसतो.

त्याने एकदा कपडे झटकलेकपड्यावरच्या रंगासोबत मनावरचे मळभ पण झटकले गेले अन तो चालू लागला. या चालण्यामध्ये उत्साह होताएक दुडकी लय होती, कारण हा दिवस नवा होता अन दूर कोठेतरी रेडिओ गुणगुणत होतां.........

"मै जिंदगीका साथ निभाता चला गया,
हर फिक्र को धुंये मे उडाता चला गया"




लेखक- प्रज्वल सुंदरराव पारडे.
(Oct 2015)

Wednesday 15 November 2017

भय



भय


रात्रीचा सुमार... बोचरी थंडी... रस्त्यावरचा अंधुक प्रकाश... सभोवताली गर्द झाडी... वाऱ्याने हलकेच होणारी पानांची सळसळ... आणि रक्ताळलेला अर्धचंद्र.... भयनिर्मितीसाठी चपखल वातावरण आणि कॉलेज अजूनही दोन किलोमीटर दूर.
या रस्त्यावरून जायची दिपकची हि काही पहिलीच वेळ नव्हती, फरक एवढाच कि हि वेळ पहिली होती. इतक्या रात्री तो कधीच या परिसरात आलेला नव्हता, कारण तशी कधी गरजच पडली नव्हती; पण आता इंजिनीयरिंगची एक्झाम तोंडावर येऊन ठेपलेली. त्यात नवीन अडमिशन आणि हि पहिली एक्झाम. रूमवर रूममेट्सच्या धिंगाण्यामुळे अभ्यास होत नसे म्हणून उदास बसलेला असताना त्याला एका मित्राने सांगितले कि कॉलेजची लायब्ररी म्हणे रात्रभर सुरु असते आणि अभ्यासदेखील खूप मस्त होतो. ते ऐकताच दिपकने निश्चय केलेला कि आज रात्री अभ्यासासाठी कॉलेजवरच जायचं.
निश्चय तर केला पण ते तितकं सोप्पं नव्हतं कारण एक तर त्याचं कॉलेज आडवळणी आणि त्याच्याकडे वाहन नाही. निदान मुख्य रस्त्यापर्यंत तरी कोणीतरी लिफ्ट देईल हे त्याला माहित होत म्हणून त्याने त्यानंतर कॉलेज फाट्यापासून कॉलेजपर्यंत तीन किलोमीटर चालत जायचा निर्णय घेतला. दिपकने जेवणाअगोदरच व्यवस्थितपणे दोन पुस्तके, दोन पेन, एक जाडजूड रफ वही आणि हनुमान चालीसा लिहिलेली एक पत्रिका बाजूला काढून ठेवली. मोबाईल जाणीवपूर्वक अभ्यासात अडथळा म्हणून सोबत घेतला नाही. आहारही झोप येऊ नये या बेतानेच केला आणि मघाशी बाजुला काढलेलं सामान घेऊन तो रुमच्या बाहेर पडला.
अपेक्षेप्रमाणे त्याला मुळशीला जाणाऱ्या एका भल्या गृहस्थाने कॉलेज फाट्यापर्यंत लिफ्ट दिली आणि जाताना “व्यवस्थित जा सांभाळून” एवढ बोलून निघूनही गेला. दिपक क्षणभर स्तिमित होऊन तिथेच तो गृहस्थ असं का बोलला याचा विचार करत थांबला. नाही म्हणायला त्याला त्या गृहस्थाच्या असं म्हणण्याचं कारण कळालही होतं पण तो ते कारण मानायला तयार नव्हता. युनिवरसिटीच्या परीक्षेसमोर त्याला या रात्रीच्या तीन किलोमीटर जंगलावजा प्रवासाची परीक्षा क्षुल्लक वाटली. आता फक्त हनुमान चालीसा म्हणत हे अंतर कापायचं हा निग्रह करून तो चालू लागला.
सुरुवातीचा एक किलोमीटर त्याला फारसं वेगळं असं काही वाटलं नाही परंतु नंतर जसा-जसा परिसराचा मूक संवाद त्याच्या कानी पडू लागला तसा-तसा त्याला त्याच्या हनुमान चालीसाचा असर कमी झाल्याचं जाणवू लागलं.मध्येच झाडावरून उडणारा पक्षी त्याच्या काळजाचा ठाव घेऊ लागला. शांततादेखील किती भयान असू शकते याची त्याला प्रथमच जाणीव झाली अन हनुमान चालीसाची जागा हळू हळू राम रामच्या महामंत्राने घेतली. या सर्व गोंधळात त्याला मोबाईल आणि इयरफोनची उणीव प्रकर्षाने जाणवू लागली होती. निदान एखादी आवडती प्लेलिस्ट लाऊन चाललो असतो तर ही ओंगळवाणी शांतता तरी नजरेसमोर आली नसती असं त्याला प्रत्येक पावलागणिक वाटू लागलं.
गावाकडच्या पिंपळावरील हडळीच्या गोष्टींनी दिपकच्या मनाभोवती फेर धरला होता, स्माशानातली भूतं भस्म लावून त्याच्या मन:पटलावर नाचु लागली होती अन वाळीत टाकलेल्या जखिणी त्याला दात विचकत वेडावून दाखवायला लागल्या तसं त्याने झटदिशी डोकं हलवलं आणि “ही फक्त एक अंधश्रद्धा आहे” असं स्वतःशीच पुटपुटला... अन लागलीच त्याच्या डोक्यात विचार चमकला कि जर ही फक्त एक अंधश्रद्धा आहे तर आपल्याला एवढं घामाने डबडबून जायचं काय काम? असं वेड्यासारखं अभावितपणे पुटपुटण्याच काय कारण? आपण नेमकं कोणाला दिलासा देत आहोत आणि ते ही कोणत्या संकटापासून? आणि ते जे काही संकट असेल ते आपल्या इतक्या पोकळ दिलास्यासमोर नमेल? असे कितीतरी विचार त्याच्या मनात चाललेले असतानाच अचानक...
अचानक दिपकला जाणवलं कि रस्त्याच्या समांतर असलेल्या जाळीच्या पलीकडे असणाऱ्या मकाच्या शेतातून खूप वेळापासून कोणीतरी आपल्यासोबत चालतंय...हळूच कोणीतरी आपल्याला पाहतंय! या जाणीवेने त्याच्या सर्वांगावर शहारा आला अन तो थांबला. दिपक थांबताच त्याला जाणवणारा आवाजही यायचा थांबला. परत तो स्वगतच म्हणाला “निव्वळ भास... बाकी काही नाही!” आता कॉलेज फक्त एक किलोमीटर उरलेलं असल्याने त्याने परत पावलं टाकायला सुरुवात केली तसा जाळीच्या पलीकडूनदेखील चालायच्या येणाऱ्या आवाजाने त्याच्या भासाच्या कल्पनेला सुरुंग लावला तशी त्याची खात्री पटली कि हा भास नाही आणि त्याचे पाय लटपटायला लागले.
दिपकची भीती आता मात्र क्षणाक्षणाला वाढतच चालली होती कारण त्याला पलीकडील शेतातून येणाऱ्या ‘त्या’ आवाजाचं कारण स्पष्ट होत नव्हतं. कोणी एखादा शेतकरी मकाला पाणी देत असेल म्हणावं तर पिक तयार झालेलं होतं, मग पाणी द्यायची गरजच काय? अशी प्रश्नार्थक शेवट करणारी उत्तरं त्याचं मन त्याला देऊ लागलं. या सर्वांत त्याला एकच दिलासा होता तो म्हणजे गर्भगळीत दिपकच्या आणि ‘त्या’ अनभिज्ञ आवाजाच्या मध्ये असणाऱ्या संरक्षक जाळीच्या कुंपणाचा! हे ही खरं होतं कि हा दिलासा खूपच तोकडा होता कारण पलीकडील गूढ आवाजाच्या अनैसर्गिक शक्तींच्या लहरी त्याला वातावरणात जाणवू लागल्या होत्या, आणि तसंही हा तोकडा दिलासा लवकरच संपणार होता कारण अजून शंभरएक पावलांवर जाळीच कुंपण संपणार होतं. त्यानंतर पलीकडील गूढ गोष्टीपासून त्याला कोण वाचवणार? या प्रश्नाचं त्याला समाधानकारक उत्तरं न मिळाल्याने तो जागीच थांबला. तो थांबताच पलीकडील येणारा आवाजदेखील थांबला.
आता मात्र दिपकच्या श्वासांच्या लयींनी साथ सोडली होती. उर भात्यासारखा खालीवर होत होता. त्याला तेथूनच उलटं पळावंस वाटू लागलं पण अधिक सुरक्षितता ही जवळ असलेल्या कोलेजवर जाण्यातच होती कारण आता कॉलेज दृष्टीपथात आलेलं. उलट जायचं म्हटलं तरी त्याला त्या अनोळख्या भीतीचा अडीच किलोमीटर सामना करावा लागणार होता. त्या तुलनेने कॉलेजचा पर्याय सोप्पा होता. फक्त अर्धा किलोमीटर परंतु यात एकच मोठ्ठी समस्या होती कारण शेजारील जाळीचं कुंपण थोड्याच अंतरात संपणार होतं.
दिपकने परत एकदा देवाचं नाव घेऊन पुढेच जायचा निर्णय घेतला. निर्णय तर घेतला खरा पण पाय मात्र चालीशी बंड करू लागले. या अजब गुरुत्वाकर्षणाच्या विरोधात तो हळू-हळू पुढे जाऊ लागला. जसा-जसा तो पुढे जाऊ लागला तसा-तसा कुंपणाचा शेवट जवळ येऊ लागला पण तो शेवट कुंपणाचा कि स्वतःचा या विचाराने त्याच्या मनाची प्रचंड घालमेल झाली. भीतीने त्याने डोळे गच्च झाकून घेउन पुढे चालू लागला. डोळे मिटले म्हणून समोरचं वास्तव मिटत नाही हे कळण्या इतपत तो प्रौढ निश्चितच नव्हता आणि तसंही डोळे झाकल्यावर तर त्याच्या डोळ्यासमोरचा भयान काळोख अजूनच गडद झाला अन त्याने खाडकन डोळे उघडले.
डोळे उघडता क्षणीच दिपकच्या लक्षात आल कि तो शेजारून येणारा आवाज बंद झाला होता. त्याला थोडंस हायसं वाटलं अन दुसऱ्याच क्षणी तो परत घामाने डबडबून गेला कारण तो आता कुंपणाच्या शेवटी उभा होता. आता त्याच्या आणि शेताच्या मध्ये असणारी जाळी संपली होती. समोर त्याच्या उंचीपुऱ्या देहयष्टीला आव्हान देणारं मकाच पिक दाटीवाटीने डोलत उभं होतं. या दृष्याकडे पाहत असतानाच त्याला पिकातून एक काळाकभिन्न रक्ताळलेला विकृत पाय बाहेर येताना दिसला आणि एक आसमंत भेदावनारी किंकाळी फोडून त्याचं थंडगार शरीर तिथेच कोलमडून पडलं. आता त्याच्या मनात कसलीही भीती उरली नव्हती कारण हृदयाची धडधड थांबली होती.
अर्धाएक तासात दिपकच्या प्रेताभोवती त्याची किंकाळी ऐकून जवळपासच्या वस्तीवरील बघ्यांची गर्दी जमली. रुग्णवाहिकेला संपर्क करून गर्दी त्या अकस्मात मृत्युच्या कारणांचे तर्क करत उभी होती आणि तीस-पस्तीस फुटांवर एक मलूल कुत्रं स्वत:च्या लंगड्या पायाची रक्ताळलेली जखम चाटत विषण्णपणे गर्दीकडे पाहत बसलं होतं.
भय जिंकलं होतं आणि जगणं हरलं होतं!!! 



लेखक:-प्रज्वल सुंदरराव पारडे.